Popular Posts

Friday, August 2, 2013

चोरटा पाऊस

चोरटा पाऊस

नको तिथेच झोंबला
असा पाऊस चोरटा
बघा टपून बसला
हा हा नभाचा पोरटा

ढग चालता बोलता
बघा आडले घरात
ताटी मनाची लावता
उभा पाऊस दारात

छत अंगाव घेऊन
वळचणीला लोंबला
मऊ शिंतोडे बनून
हळू घरात घुसला

भल्या पहाटे पहाटे
आडावरती लपला
हंडा भरता भरता
दव बनून खेटला

भर दुपारी बागेत
त्याने बंगला बांधला
मग सखीला बघून
हळू फांदीशी झिंगला

नाग पंचमी सणाला
झिम्मा सईशी खेळला
पिंगा घालता घालता
गडी गर्दीत घुसला

पा णी अडवा जिरवा
असा पुढारी बोलला
माळ बोडका बघून
गाली पाऊस हसला

मेंहदी हाताला बघून
पाऊस डोळ्यात दाटला
मग मु-हाळी बनून
असा एकांटी भेटला

टाळमृदंग वाजता
भक्ती रसात भिजला
झेंडा भगवा घेऊन
असा दिंडीत नाचला

माठ फो़डीला कृ्ष्णानं
करी गवळण कागांवा
पेंद्या हसत म्हणाला
जावा शरण यादवा


दशरथ यादव, पुणे

Thursday, August 1, 2013

संमेलनाध्यक्ष यादव यांचे भाषण


राज्यस्तरीय
लोकनेते शरदरावजी पवार कृषी साहित्य संमेलन
संमेलनाध्यक्ष दशरथ यादव यांचे भाषण
------------------------

बंधु व भगिनीनों
सर्वांना सप्रेम जय जिजाऊ...  

अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या वतीने होणा-या पहिल्या राज्यस्तरीय शरदरावजी पवार कृषी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी माझी निवड करून शेतक-याच्या मुलांचा सन्मान केला त्याबद्दल साहित्य परिषदेच्या राज्यातील सर्व पदाधिकारी, साहित्यिक व हितचिंतकाचे मनापासून आभार मानतो.
शेतक-याने फक्त नांगर धरून मातीत घाम गाळावा, त्याने लेखणी हातात धरू नये असे सांगणारी भाकाड पुराणाचे रक्षकांना शेतातही साहित्य फुलते याची कदाचित जाणीव नसावी. पण साहित्याचा खरा उगम हा शेताशिवारात आणि कष्टकरी कुणब्यांच्या घामातून झाला आहे. माझ्या सारख्या जन्मताच शेती व मातीची नाळ जोडून रानमातीत कष्ट करणारा..शेतकरी कुटुंबातील धडपड्या..शालेय शिक्षणानंतर माझ्यातील बंडखोर वृतीला चालना मिळाली. बारमाही कष्ट करून वर्षे पुरेल एवढी चंदी मिळेल की नाही याची खात्री नसायची..पण काळ्या आईची सेवा आईबा प्रामाणिकपणे करायचे...घाम गाळल्यानंतर काळी आई एकदा तरी ओ देईल यावर त्यांची ठाम विश्वास होता.
.. आणि व्हायचेही तसेच...मुठीनं पेरलं तर खंडीने पिकायचे. याच मातीत माझी साहित्याची बीजे रुजली आणि मग ती क-हेच्या काठावर बहरत बहरत मराठी भाषेच्या जगतात पोचली. शेतक-याचा मुलगा लेखक, पत्रकार, कवी, साहित्यिक, झाला. प्रस्थापित नाकेमुरडून कौतुक करायचे. समजायचे पण.मनातील बंडखोर वृत्ती स्वस्थ बसू देत नव्हती. कुठे तरी बळीराजाची संस्कृती पुन्हा या देशात रुजायाला हवी, काळ्या शिवारात पुन्हा बु्द्धांचा विचार हसायला हवा...जुने ते सोनं ही म्हण पुन्हा सिद्ध करण्यासाठी मन सैरावैरा फिरु लागले..दोन दशकाचा परिवतर्नाचा अनुभव पाठीशी घेत घेत साहित्य लेखनाला धुमारे फुटले..आज लोक स्वाकरतात, पण त्यामागची तपश्चर्या, त्याग, कष्ट,जिद्द, चिकाटी, कीती महत्वाची होती ते कळते. गावाच्या शिवेवर, शेताच्या बांधावर, गवताच्या कुंद्यावर, पानाच्या बुंदावर, फुलाच्या गंधावर, ज्वारीच्या कणसावर...घामाच्या थेंबावर...साहित्य निर्माण झाले.

कृषी संस्कतीमधील वास्तव जीवन व तंत्रज्ञानावर आधारित शेतीचे महत्व साहित्यात आले तरच जगाच्या बाजारात शेतकरी प्रगती करु शकतो. मातृसत्ताक व कृषी संस्कृतीशी नाळ जोडलेल्या समाजाचे वास्तव चित्रण आजपर्यंत साहित्यात हवे तेवढे उतरले नाही.
 कथा व कल्पनात लेखक साहित्यिक रमल्याने कृषी साहित्य परिपूर्ण झाले नाही. पुरोगामी चळवळीचा वारसा असणारे, ग्रामीण, शहरी साहित्याने वैचारिक मंथन करण्याचे काम केले. मात्र कृषी साहित्य त्यांच्यापासून दूर राहिले. कथा, कल्पना, नाट्य मनोरंजनात्म साहित्य लिहिणा-यांकडून वास्तव लेखन झाले नाही. ही खरी शोकांतिका आहे.
हरितक्रांतीच्या पाच कलमी कार्यक्रमाने शेती, सहकार, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढला. शेतीत अमूलाग्र बदल झाला त्याचा वेद साहित्याने घेतला नाही. अजूनही जुन्याच पद्धतीचे ग्रामीण जीवन साहित्यातून मांडणारे, लेखक, कवी यांनी वास्तव समाजजीवन साहित्यातून जपावे.
 प्राचीनकाळी नदीच्या काठावर मातीत बियाण्याची पेरणी करणारी, निरुती या महिलेच्या नावाने नवरात्र उत्सव साजरा केला जातो. शेती शिवाराशी नाते जोडून जीवन जगणारी इथली माणसे
हजारो वषे राबराब राबतात. पण त्यांची वेदना साहित्यात किती आली, याचा विचार करणे गरजेचे आहे. बळीराजाशी नाळ असलेला इथला शेतकरी काबाड कष्ट करीत राहिला, प्रामाणिक शेतक-यांच्या भावनेचा बाजार मांडून धर्माची खोटी अस्मिता त्यांच्यावर लादून देवाधर्मा्च्या नावाखाली वैदिक परंपरा जोपासणा-यांनी पिळवणूक केली.
सत्याचा मागोवा घेणारा शेतकरी कायम सत्यापासून कोसोमेल दूर राहिला. प्रंचंड बुद्धीमत्ता, लढाऊ वृत्ती व मुक्या मातीला बोलते करण्याची जबरदस्त ताकद असणारा मूळनिवासी कुणबी विकासापासून दूर राहिला. निसर्गाच्या लहरीपणाला कवेत घेत शेतीत सोनं पिकवणारा खरा बळी पाताळात घालण्याचे काम इथल्या पुराणमतवाद्यांनी आज सुरु ठेवले आहे. शेतीमातीशी नाळ असणारे लोक लिहू लागले आहेत. नव्या साहित्याचा वेद घेण्याचा त्यांचा जोष पुन्हा बळीराज्य आणण्याचे एक पाऊल आहे. असेच म्हणावे लागेल. समाजात सगळ्या गोष्टींना प्राधान्य देवून त्याचा गवगवा केला जातो. पण शेतक-यांची नेमकी सल काय आहे, याचा वेद घेण्याचा प्रयत्न फार थोड्या साहित्यिकांनी घेतला. लोकसंख्येच्या प्रमाणाचा विचार करता सत्तर टक्के शेतीवर जगणा-या या कुणबी समाजातील कीती लोक लिहितात. हे प्रमाण अतिशय नगण्य आहे. सध्याच्या काळात ग्रामीण, दलित, भटक्या, प्रबोधन करणा-या साहित्य चळवळी पुढे येत आहेत.
लोकांना प्रेरणा देणारे, जगण्यात आनंद निमार्ण करणारे साहित्य समाजाला पुढे नेवू शकते.
साहित्याचा व आमचा काही संबध नाही, अशीच भावना सनातनी लोकांनी रुजवली. भाकड पुराणकथा सांगून भटांनी समजात दरी पाडली.-
आमुच्या देशीचे अतुल स्वामी वीर || होते रणधीर ||मरुत्यास ||
बळीस्थानी आले शूर भैरोबा || खंडोबा, जोतिबा || महासुभा ||१||
सद्गुणी पुतळा राजा मुळ बळी || दशहरा, दिवाळी ||आठविती ||२||
क्षत्रिय भार्या "इडा पीडा जाओ || बळी राज्य येवो "||अशा का बा ?||३||
आर्य भट आले, सुवर्ण लुटिले || क्षत्री दास केले ||बापमत्ता ||४||
वामन का घाली बळी रसातळी || प्रश्न जोतीमाळी ||करी भटा ||५||

महात्मा फुले यांनी शेतक-यांचा आसूड सारखा ग्रंथ लिहून वेदना मांडली. ग्रामीण जीवनावर झोंबी़ कांदबरी लिहिणारे, प्रा. आनंद यादव असो नाही तर रानातल्या कविता लिहिणारे ना.धो महानोर, विठ्ठल वाघ असो. बारोमास सारखी कांदबरी लिहिणारे सदानंद देशमुख यांनी काही प्रमाणात शेतीविषयी लोकांच्या कुतूहल जागे करण्याचा प्रयत्न केला.


कृषी साहित्य लेखनाचा इतिहास
-------------------------------------
येडागबाळा शेतकरी त्याच्या
दिसण्यावर नका जाऊ
शहरामधले कोणते मशीन
धान्य पिकवते भाऊ...
असा प्रश्न करणारी कल्पना दुधाळसारखी नव्या पिढीतील कवयित्री असो.

जगाचा पोशिंदा असणारा शेतकरी आज उपाशी आहे. त्याच्या जीवनमानाकडे कोण पाहतो.
शेतक-यांच्या दाणापाण्याला हात लावला तर मुलाहिजा पाळणार नाही. अशी सक्त ताकीद सैन्यांना देणारे छत्रपती शिवाजी महाराज कोठे...दुष्काळात शेतक-यांचे कर्ज माप करणारे संत तुकाराम महाराज कुठे...देशातील शेतक-यांचे कर्जमाप करुन त्यांना नवीन उद्योगाची दालने उघडून देणारे लोकनेते शरद पवार कोठे...तर कुणब्यांच्या न्याय हक्कासाठी लढा उभारुन त्यांना मनुवादी गुलामीतून मुक्त करणारे युगपुरुष पुरुषोत्तम खेडेकर कुठे....
साहित्याच्या गोंडस नावाखाली सरकारी पैशाची लयलूट करणारे सनातनी साहित्यिक मिरवीत आहेत. याचा आता उबग आला आहे. ग्रामीण, दलित, भटके, सोशितांवर लेखन करणारे सगळे एका छताखाली आणून त्यांच्यात समन्वय करण्याची गरज आहे.
साहित्य हाच समाजाचा आरसा असतो. समाजात होणा-या सगळ्या घटनांचा लेखाजोखा साहित्यात येण्याची गरज असताना, येथील मुळनिवासी 90 टक्के लोकांची मूळ बोली भाषा सोडून चार टक्के लोकांची भाषा समाजावर लादून त्यांना अडाणी, अज्ञानी ठरवणे हा प्रकार हजारो वषे सुरू आहे.